Ad will apear here
Next
साडेतीन हजार पुस्तके भेट देणारा माणूस
पंढरपूर : सावळ्या विठूरायाच्या पंढरीत विठूरायाच्या भक्तीने वेडी झालेली अनेक माणसे येत असतात. असाच एक वेडा माणूस पंढरपुरात आहे; पण त्याचे वेड जरा वेगळे आहे. ते वेड आहे लोकांना पुस्तके भेट देण्याचे. आजपर्यंत विविध प्रसंगांच्या निमित्ताने या माणसाने जवळपास साडेतीन ते चार हजार पुस्तके लोकांना भेट दिली आहेत. त्या माणसाचे नाव आहे रवी वसंत सोनार. ते स्वतःही कवी आणि लेखक आहेत. वाचनसंस्कृती वाढविण्यासाठी हे वेड जोपासत असल्याचे सोनार आवर्जून सांगतात. 

२३ एप्रिल या जागतिक पुस्तक दिनाच्या औचित्याने रवी सोनार यांची भेट घेऊन संवाद साधल्यावर त्यांच्याबद्दल आणि त्यांच्या पुस्तकभेटीच्या उपक्रमाबद्दल सविस्तर माहिती मिळाली. पंढरपुरातील एका सामान्य कुटुंबात जन्मलेल्या रवी सोनार यांचे प्राथमिक शिक्षण सोलापूर येथील बसवेश्वर प्रशालेत झाले. माध्यमिक शिक्षण दौंड (जि. पुणे) येथील शेठ ज्योतिप्रसाद विद्यालयात, तर दहावीचे शिक्षण त्यांनी पंढरपूर येथील द. ह. कवठेकर प्रशालेत झाले. तंत्रशिक्षण विभागातील मोटार मेकॅनिक व्हेइकल कोर्स त्यांनी पंढरपूर येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून पूर्ण केला. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण रयत शिक्षण संस्थेच्या पंढरपूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात झाले. केवळ मराठीच नव्हे, तर एकूणच भाषा या विषयावर त्यांचे विशेष प्रेम. म्हणून त्यांनी ‘बीए’ला हिंदी हा विषय निवडला.

शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी रोजीरोटीसाठी छोटेखानी मोटार गॅरेज सुरू केले. अजूनही ते गॅरेज चालवतात. लेखनाची आवड महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच त्यांना लागली होती; मात्र कुटुंबाची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नसल्यामुळे त्यांना लेखनाकडे फारसे लक्ष देता आले नाही. मोटार गॅरेजवर लक्ष केंद्रित केल्याने लेखनाचा छंद काही काळ थांबवावा लागला. आर्थिक परिस्थिती सुधारल्यावर त्यांनी लेखनाचे काम उत्साहाने सुरू केले. २०१२ साली त्यांनी ‘रंगमहाल’ नावाचा लावणीसंग्रह लिहिला. तो पंढरपूर येथील वसंतपुष्प प्रकाशनाने प्रकाशित केला. २०१३ साली त्यांचा ‘विषयसुखाचा सुवर्णक्षण’ हा दुसरा लावणीसंग्रह प्रकाशित झाला. त्याच साली ‘भोवरा अन् भिंगरी’ हा त्यांचा ललित लेखसंग्रह कोल्हापूर येथील रश्मी बुक एजन्सीने प्रकाशित केला. याच वर्षात त्यांचा ‘सौंदर्यलेणं’ हा लावणीसंग्रह कोल्हापुरातील रावा प्रकाशनाने प्रकाशित केला. २०१४मध्ये कोल्हापूर येथील निखिल प्रकाशनाने ‘आम्ही गोकुळच्या गोपिका’ हे त्यांनी लिहिलेल्या गवळणींच्या संग्रहाचे पुस्तक प्रकाशित केले. याच साली पुणे येथील अक्षरमानव प्रकाशनाने ‘पुष्पांश मातृऋण गाथा’ नावाचा त्यांचा कवितासंग्रह प्रकाशित केला. कोल्हापूर येथील नारायणी प्रकाशनने ‘मातृवियोग’ नावाचा प्रसिद्ध केलेला त्यांचा कवितासंग्रह हे त्या वर्षातील त्यांचे तिसरे पुस्तक ठरले. २०१५मध्ये ‘इश्काचा दरबार’ हे पुस्तक कोल्हापूर येथील निखिल प्रकाशनाने, तर सांजफूल नावाची कादंबरी कोल्हापूर येथीलच रश्मी बुक एजन्सीने प्रकाशित केली. २०१६मध्ये सोलापूर येथील शिवप्रज्ञा प्रकाशनने ‘बाप आणि पितृत्व’ हा त्यांचा कवितासंग्रह प्रकाशित केला. सन २०१७मध्ये ‘वसंतपुष्प’ नावाचा त्यांनी लिहिलेला हायकूसंग्रह पुणे येथील अक्षरवाङ्मय प्रकाशनाने प्रकाशित केला. तसेच सोलापूर येथील शिवप्रज्ञा प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या ‘सखी सोबती ...क्षण वैविध्यांची गुंफण’ या त्यांच्या संमिश्र काव्यसंग्रहाची नोंद गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली. सर्वांत दीर्घ शीर्षकाचा काव्यसंग्रह ठरल्याने त्यांना हा मान मिळाला. (त्या संदर्भातील सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.) मराठी भाषेवरील प्रेमामुळेच त्यांनी अल्पावधीत मराठी साहित्य क्षेत्रात नाव कमावले आहे.

गॅरेजचे काम करता करताच त्यांनी पुस्तके व वर्तमानपत्रे वाचण्याची आवड जोपासली. त्याचाच उपयोग त्यांना लेखनासाठीही झाला. त्यांची पुस्तके जशी प्रकाशित होऊ लागली, तशी ती पुस्तके अनेक लोकांनी वाचावीत असे त्यांना वाटू लागले. लोकांनी आपली पुस्तके वाचण्याबरोबरच सर्वच लेखकांची पुस्तके वाचली पाहिजेत, असे त्यांना वाटत होते. त्यातूनच वाचनसंस्कृती वाढवण्याच्या उद्देशाने त्यांनी पुस्तके भेट देण्याचा विधायक उपक्रम सुरू केला. स्वतःच्या पुस्तकांबरोबरच अनेक नामवंत लेखकांची पुस्तके विकत घेऊन त्यांनी लोकांना भेट दिली. आध्यात्मिक, सामाजिक पुस्तकांसोबतच काव्यसंग्रह, कथासंग्रह, व्यक्तिचित्रे, आत्मचरित्रे, ललित, गझल, समीक्षा ग्रंथ आणि बालसाहित्य अशी वैविध्यपूर्ण पुस्तके त्यांनी लोकांना भेट म्हणून दिली. 

एखाद्याच्या सत्काराचा कार्यक्रम असो वा लग्न समारंभ असो, कोणाचा वाढदिवस असो वा कोणाच्या दुकानाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम असो..... एवढेच काय अगदी कोणाच्या सांत्वनाची वेळ असो.... अशा प्रत्येक प्रसंगी त्यांनी लोकांना पुस्तके भेट दिली आहेत. अंधांनाही आपली पुस्तके वाचता यावीत, म्हणून त्यांनी आपली दोन पुस्तके ब्रेल लिपीत छापून घेऊन ती पंढरपूरच्या अंधशाळेला भेट दिली. आजवर त्यांनी लोकांना भेट दिलेल्या पुस्तकांची संख्या सुमारे साडेतीन ते चार हजारांच्या आसपास आहे.

‘तुम्ही भेट म्हणून दिलेली पुस्तके लोक वाचतात का,’ या प्रश्नावर ते म्हणाले, ‘मी कोणाला दिलेले पुस्तक त्यांनीच वाचावे, असे काही नाही. मी दिलेले पुस्तक शेवटी कोणाच्याही हातात पडले, तर त्यातील दोन तरी ओळी कोणी तरी निश्चितच वाचत असतो. याबाबत मला अनेकांनी फोन करून आपल्या प्रतिक्रिया कळवल्या आहेत.’ 

‘ज्यांना मी थेट पुस्तक भेट दिले नव्हते, अशा वाचकांच्याही प्रतिक्रिया मला आल्या आहेत. ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक उत्तम कांबळे यांनीही मला आवर्जून पुस्तक वाचून ते आवडल्याची प्रतिक्रिया कळवली होती. लोकांच्या थेट प्रतिक्रिया येत असल्यामुळे हल्ली लोकांचे पुस्तके वाचनाचे प्रमाण कमी झाले आहे, यावर माझा अजिबात विश्वास नाही. पुस्तक वाचणे, लिहिणे व पुस्तक भेट योजना सुरू केल्यामुळे माझ्यातील साहित्यिक बाहेर पडला,’ अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली. 

(रवी सोनार यांच्या मनोगताचा व्हिडिओ सोबत देत आहोत.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/NZOLBN
 अशी माणसे फारच दुर्मिळ असतात . छान बातमी आहे .2
 रवि सोनार यांना फार फार शुभेछ्या, त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व वंदन,मि देखील एक सोनार आहे त्यासाठी माला खुप आनंद वाटला,1
 Bhamare Saheb Tumi sonar asalya Tari mi Kala Premi ahe eka kalakarache Nate jawalalche ahe1
 We need more Like him.
best wishes.
Similar Posts
सर्वांत दीर्घ शीर्षकाचा मान मराठी पुस्तकाला; काव्यसंग्रहाची ‘गिनेस बुक’मध्ये नोंद सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील साहित्य क्षेत्रातील प्रसिद्ध नाव असलेले कवी रवी वसंत सोनार यांच्या काव्यसंग्रहाची ‘गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्’मध्ये नुकतीच नोंद झाली आहे. त्यांच्या ‘सखीसोबती.... क्षणवैविध्यांची गुंफण’ हा त्यांचा काव्यसंग्रह जगातील सर्वांत दीर्घ शीर्षक असलेला काव्यसंग्रह ठरला आहे. ‘दी
गांधी विचार परीक्षेचा निकाल जाहीर सोलापूर : जळगाव येथील गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे घेतलेल्या गांधी विचार संस्कार परीक्षेचा जिल्हास्तरीय निकाल जाहीर झाला असून, यात रोपळे (ता. पंढरपूर) येथील पाटील विद्यालयातील दहावीची विद्यार्थिनी चैताली धोंडीराम भोसले हिने या परिक्षेत जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला
रोपळे येथे साखरेचे अल्प दरात वाटप सोलापूर : विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्यातर्फे कारखान्याच्या सभासदांना अल्प दरात साखरेचे वाटप करण्यास सुरुवात करण्यात आली. आमदार बबनराव शिंदे यांच्या पुढाकाराने राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे सणासुदीच्या दिवसांत घरपोच साखर मिळाल्याने सभासदांमधून आनंद व्यक्त केला जात आहे.
मूकबधिर शाळेला सामूहिक श्रवण यंत्र भेट सोलापूर : मूकबधिर विद्यार्थांना वाचासिद्धीसाठी रोपळे (पंढरपूर) येथील सुप्रभात ग्रुपतर्फे प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून सामुहिक श्रवण यंत्र भेट दिले.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language